एटापल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; योगातून निरोगी जीवनाचा संदेश
उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या उपस्थितीत तालुका कार्यालयात योगाभ्यास; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
एटापल्ली | प्रतिनिधी
दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त एटापल्ली तालुका कार्यालयात योग दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपविभागीय अधिकारी एटापल्ली व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पतंजली योग समितीचे सदस्य तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाला तहसीलदार मा. घांगुर्डे साहेब, नायब तहसीलदार मा. गायकवाड साहेब, पतंजली योग समितीचे सर्व सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी, तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी तालुका प्रभारी योग शिक्षक मा. महादेव करमरकर यांनी योगाचे महत्त्व विषद करत नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, तणाव कमी होतो आणि निरोगी जीवनशैली घडते, असे मार्गदर्शन केले. त्यांनी प्राणायाम, विविध योगासने, सूक्ष्म व्यायाम तसेच पोट व पाठीच्या आरोग्यासाठी उपयुक्त योगप्रकारांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांकडून प्रत्यक्ष सराव करून घेतला.
उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्तपणे योगाभ्यासात सहभाग घेत निरोगी जीवन जगण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या माध्यमातून “करू योग, राहू निरोग” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा हा कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाला.

एटापल्ली तालुका कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगाभ्यास कार्यक्रमात सहभागी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पतंजली योग समितीचे सदस्य व नागरिक.
