
निलिमा बंडमवार
मुख्य संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स.
नागपूर:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक प्रशासक म्हणून नियुक्ती-पदभार स्वीकृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये दुर्दैवाने मोठा घोटाळा झाला आणि बँक त्यातून बाहेर येऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यावसायिक आणि राष्ट्रीयीकृत बँकांवर अवलंबून राहावे लागले. अशा परिस्थितीत आ.आशिष देशमुख यांनी पुढाकार घेतला आणि बँकेवर प्रशासक नेमण्याचा विषय मांडला. त्यानंतर आम्ही विद्याधर अनास्कर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला प्रशासक म्हणून नेमण्याचा प्रस्ताव समोर आला. म्हणून आपण देशात पहिल्यांदाच राज्य सहकारी बँकेला नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकपदी नेमण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सहकारी बँकेची धुरा विद्याधर अनास्कर यांच्याकडे सोपवल्यानंतर ती बँक दरवर्षी ₹600 कोटी नफ्यात आली. आता नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेला 3 वर्षांसाठी संस्थात्मक प्रशासकपदी नेमले आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला फायदा होईल. राज्य सहकारी बँकेने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची हमी घेतली आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काहीही अडचण आली तरी तेथील ठेवींच्या रकमेची हमी राज्य सहकारी बँकेची असेल आणि कोणाचाही पैसा बुडणार नाही. आता लवकरच सर्व सरकारी विभागांनाही नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसोबत बँकिंग करण्याविषयी देखील आदेशित केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सहकाराला गांभिर्याने घेतले आहे. देशात 2 लाख बहुउद्देशिय प्राथमिक सहकारी संस्था उभारल्या जाणार असून त्यातल्या 10 हजार संस्था महाराष्ट्रात असणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 886 संस्था उभारण्यात आल्या आहेत. या नव्या संस्था आपल्या प्रयत्नांतून उभ्या करु शकलो तर सहकारासोबत आपल्याला गावांपर्यंत समृद्धी नेता येईल. या संस्थांना 13 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय करता येणार असून यामुळे या संस्थाही समृद्ध होतील. तसेच या संस्थांचे जाळे तयार केले आणि जिल्हा बँक जिवंत झाली तर केवळ शेतकरीच नाही तर तरुणाईदेखील सक्षम होऊ शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकज भोयर, मंत्री आशिष जयस्वाल, आ. आशिष देशमुख, आ. चरणसिंग ठाकूर, विद्याधर अनास्कर व इतर मान्यवर उपस्थित होते.