राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश.
मराठी चित्रपट धोरण समिती गठीत करणार
नागपूर:- गेली अनेक वर्षे नागपूरला फिल्म सिटी व्हावी, अशी मागणी होत आहे. अनेकदा कलावंतांचे डेलिगेशन्स सरकारला भेटले. कित्येक सरकारं बदलली. पण, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे हा विषय मार्गी लागला आहे. नागपुरात 100 हेक्टरमध्ये चित्र नगरी (Film City) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नागपुरात चित्र नगरी व्हावी. तसे झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. नागपूरला विमानतळ असल्यामुळे कलावंतांना देखील सोयीचे ठरेल. मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही इथे होऊ शकेल. विदर्भात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. त्यामुळे चित्रीकरणाच्या निमित्ताने पर्यटनालाही चालना मिळेल. अशा अनेक बाबींवर यापूर्वी प्रकाश टाकण्यात आला. काँग्रेसचे सरकार असताना विदर्भातील अनेक कलावंतांनी त्याचा पाठपुरावा केला.राज्यात २०१४ मध्ये भाजपच्या नेतृत्वातील सरकार आले. त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय गांभीर्याने घेतला. यासंदर्भात सातत्याने चर्चा झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील यापूर्वी दिग्दर्शक सुभाष घई आणि अभिनेता संजय दत्त यांच्यासोबत चर्चा केली आहे. अखेर मुनगंटीवार यांनी नागपूरला फिल्म सिटीचे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला.
सुधीर मनगंटीवार यांचे आदेश
चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचला आहे. आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे. यासाठी समिती गठीत करुन कामाला गती द्यावी, अशा सूचना मुनगंटीवार यांनी दिल्या. मराठी चित्रपट अनुदाना संदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
अतिरिक्त 5 लाखांचे अनुदान
अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहन पर रक्कम देण्याचा निर्णय झाला. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण दुप्पट अनुदान देण्यात येईल, अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.