*चामोर्शी येथील नवजीवन नर्सिंग स्कूलमध्ये लॅम्प लायटिंग कार्यक्रम उत्साहात पार*…
तालुका प्रतिनिधी चामोर्शी : चामोर्शी येथील नवजीवन नर्सिंग स्कूलमध्ये एक प्रेरणादायी आणि शालेय सेवा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा लॅम्प लायटिंग कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी नर्सिंग क्षेत्रातील सेवा, समर्पण आणि शिस्त यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून, शैक्षणिक प्रगतीसह रुग्णसेवा, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षतेची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ. लता गोवर्धन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कुमारी मृणाल गोवर्धन, प्राचार्य विकास गोरडवार आणि समुपदेशक नागेश मादेशी, विनोद यमोजवार,यांनी देखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात नवजीवन नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे, त्यांना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
लॅम्प लायटिंग हा नर्सिंग स्कूलच्या शालेय परंपरेचा एक महत्वपूर्ण भाग आहे, जो विद्यार्थ्यांना सेवाभावी कार्य, शिस्त आणि कर्तव्यदक्षतेच्या मूल्यांची जाणीव करून देतो. नर्सिंग शाळेतील विद्यार्थिनींना कार्यक्रमामुळे एक नवी प्रेरणा मिळाल्याचे सर्वांनी मान्य केले.
कार्यक्रमाचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. नवजीवन नर्सिंग स्कूल हे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही, तर त्यांना समाजसेवेच्या दृष्टीनेही तयार करत आहे, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री धुडसे यांनी केले तर, प्रास्ताविक पायल काटकर, आणि आभारप्रदर्शन सिमा पुण्यप्रेडिवार यांनी मानले.
