खमनचेरू आविका संस्थेचे सभासदत्व रद्द; बाजार समिती सभापती रविंद्र आत्राम अडचणीत
डॉ. अजय कंकडालवार यांच्या तक्रारीनंतर सहाय्यक निबंधकांचा आदेश; सभापतीपदावरही संकटाची शक्यता
अहेरी :
तालुक्यातील खमनचेरू येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे (आविका) सभासद असलेले अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्रराव (बाबा) भगवंतराव आत्राम यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सहकार व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांच्या बाजार समितीच्या सभापतीपदावरही संकटाची शक्यता निर्माण झाली आहे.
रविंद्रराव आत्राम हे माजी कॅबिनेट मंत्री व अहेरीचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे बंधू आहेत. खमनचेरू येथील आविका सहकारी संस्थेच्या सभासदत्वाच्या आधारेच ते अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून निवडून आले होते. मात्र आता त्यांचे संस्थेचे सभासदत्वच रद्द झाल्याने त्यांच्या सभापतीपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय रामय्याजी कंकडालवार यांनी 23 मार्च 2026 रोजी अहेरी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत रविंद्रराव आत्राम यांचे खमनचेरू आविका संस्थेचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
या तक्रारीवर सहाय्यक निबंधक कार्यालयाने अर्जदार, गैरअर्जदार तसेच खमनचेरू आविका संस्थेचे सचिव यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून सहाय्यक निबंधक प्रशांत गाडे यांनी 6 एप्रिल 2026 रोजी आदेश जारी केला.
आदेशानुसार, आदर्श उपविधी प्रकरण 6(17)(3) नुसार संस्थेच्या कार्यक्षेत्रातील मूळ रहिवासी नसणे तसेच संपूर्ण जमीन विक्री किंवा हस्तांतरण केल्यामुळे रविंद्रराव भगवंतराव आत्राम हे खमनचेरू आविका सहकारी संस्थेचे सभासद म्हणून अपात्र ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे अहेरी तालुक्यातील सहकार व राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
