रस्त्याच्या दुर्दशेविरोधात एटापल्लीमध्ये साखळी उपोषणाचे आमरण उपोषणात रूपांतर; बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांचा जाहीर पाठिंबा
एटापल्ली : शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता तसेच एटापल्ली–देवदा–गडचिरोली, हेडरी–गट्टा आणि एटापल्ली–जारावंडी या प्रमुख मार्गांची अत्यंत दयनीय अवस्था लक्षात घेता सुरू असलेले साखळी उपोषण आता आमरण उपोषणात परिवर्तित करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांवर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात उडणारी प्रचंड धूळ यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
धुळीमुळे हवा प्रदूषित होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना श्वसनविकार, अॅलर्जी आणि डोळ्यांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. व्यापारी वर्गालाही या समस्येचा मोठा फटका बसत असून ग्राहकांची ये-जा घटल्याने आर्थिक उलाढालीवर परिणाम होत आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ रस्त्यापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी निगडित ठरला आहे.
या गंभीर प्रश्नाकडे वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप करत व्हॉइस ऑफ मीडियाच्या एटापल्ली शाखेच्या पत्रकारांनी प्रथम बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. “आमच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आम्हाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. आमरण उपोषणादरम्यान कुणालाही काही कमी-जास्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील,” असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान, काल दिनांक,12/02/3026 रोजी व्यापारी संघटना एटापल्ली यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत पूर्ण दिवसभर बाजारपेठ बंद ठेवली. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून प्रशासनाविरोधातील नाराजी व्यक्त केली. बाजारपेठ बंदमुळे आंदोलनाला व्यापक लोकसमर्थन लाभल्याचे स्पष्ट झाले असून शहरातील वातावरण आंदोलनमय झाले आहे.
आंदोलनस्थळी विविध सामाजिक संघटना आणि नागरिक भेट देऊन समर्थन व्यक्त करत आहेत. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती, धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एटापल्लीतील नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी सर्वसामान्यांची ठाम अपेक्षा व्यक्त होत आहे.
