अहेरी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; कांचनपूर येथील विवाहितेवर अत्याचार आणि चिमुरड्याच्या हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा.
गडचिरोली:- जिल्ह्यात मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथील विवाहितेवर अत्याचार आणि चिमुरड्याच्या हत्या प्रकरणाचा अंतिम निकाल बुधवारी लागला. विवाहितेवर अत्याचार करून तिच्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलाची तोंड दाबून निघृण हत्या करणाऱ्या कांचनपूर येथील संजू विश्वनाथ सरकार या नराधमाला अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ‘मरेपर्यंत फाशी’ची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने संपूर्ण जिल्ह्यात न्यायाचा विजय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथे १९ जून २०१७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अख्ख्या महाराष्ट्राला हादरुवून सोडणारी घटना घडली होती. मोलमजुरी करिता पीडितेचा पती रोजगारासाठी तेलंगणात गेला होता.घरी पीडिता आणि तिचा तीन वर्षांचा मुलगाच राहत होते. ही संधी साधून शेजारी राहणाऱ्या संजू सरकार याने मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घरात घुसून महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. या झटापटीत कुशीत झोपलेल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला जाग आली आणि तो रडू लागला. आपले पातक उघड होईल या भीतीने नराधम संजूने त्या निष्पाप बालकाचे तोंड आणि नाक दाबून त्याला जागीच ठार केले. संतापलेल्या आईने प्रतिकार केला असता, आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला मरणासन्न अवस्थेत सोडून तिथून पळ काढला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माता आणि निपचित पडलेला चिमुरडा पाहून गाव हादरले होते. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने दिलेली साक्ष या खटल्यात सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरली. तत्कालीन तपास अधिकारी गजानन टोम्पे यांनी अत्यंत बारकाईने पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
अहेरी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश आर. कदम यांच्यासमोर या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने पुराव्यांची पडताळणी करताना हे कृत्य ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ श्रेणीतील असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३०२ अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल जन्मठेप, तर घरफोडीसाठी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. यासोबतच पीडित महिलेला विधी सेवा प्राधिकरणाकडून आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा निकाल लागला आहे. पोटच्या गोळ्याला गमावलेल्या त्या मातेच्या डोळ्यांतील अश्रू आजही सुकलेले नाहीत, मात्र कायद्याने दिलेल्या या कडक शिक्षामुळे तिला थोडासा दिलासा मिळाला आहे. अशा क्रूर कृत्या करणाऱ्या नराधमांना या निकालामुळे मोठा धडा मिळाला असून, गडचिरोली पोलीस दलाच्या कार्यक्षम तपासाचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
