लॉयड्स प्रकल्पाच्या भूसंपादन पार्श्वभूमीवर येनापूर–जयरामपूर मार्ग ५ दिवस बंद
१० ते १४ मार्चदरम्यान वाहतुकीवर तात्पुरती बंदी; आंदोलने टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
गडचिरोली, दि. ९ :
आष्टी पोलीस स्टेशन हद्दीतील कोनसरी येथे सुरू असलेल्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या लोह प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर येनापूर – जयरामपूर मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केला आहे. हा आदेश १० मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.
मौजा मुधोली चक क्रमांक २, पारडी देव (रिठ) आणि जयरामपूर येथील खाजगी तसेच शासकीय जमिनींचे मोजमाप व भूसंपादन प्रक्रिया ११ मार्चपासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन आंदोलने किंवा निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
यानुसार येनापूर ते जयरामपूर या मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी राहणार आहे. मात्र प्रवासी बसेस तसेच पाणीपुरवठा, महावितरण, दूरसंचार आणि रस्ते दुरुस्ती संदर्भातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
हा आदेश मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ व ११६ अन्वये जारी करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत.
