*पोलीस मदत केंद्र बेडगाव येथे भव्य आरोग्य मेळावा; 166 नागरिकांची मोफत तपासणी*
*कोरची :-* (प्रतिनिधी) : गडचिरोली पोलीस दल व पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमाच्या माध्यमातून, तसेच नागपूर येथील डॉक्टर शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोरची तालुक्यातील पोलीस मदत केंद्र बेडगाव येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या संकल्पनेतून आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला. प्रभारी अधिकारी दिनेश खोटेले व पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे यांच्या नेतृत्वात पोलीस मदत केंद्र बेडगाव येथील अधिकारी-अंमलदार, एसआरपीएफ व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत झालेल्या या मेळाव्यास पोलीस मदत केंद्र बेडगाव हद्दीतील सुमारे 200 ते 250 नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांना रोजगार मेळाव्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच जास्तीत जास्त युवक-युवतींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
मेळाव्यात नागपूर येथील तज्ञ डॉक्टर डॉ. जीवक काकडे तसेच ग्रामीण रुग्णालय कोरची येथील डॉ. प्रांजली करंजेकर व त्यांच्या पथकाने नागरिकांची तपासणी केली. यामध्ये नेत्र, शुगर, बीपी, इसीजी, हर्निया, अस्थिरोग, सिकलसेल, मलेरिया आदी आजारांची तपासणी करण्यात आली. एकूण 166 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असून 64 रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
याशिवाय, व्हीएलई नाशिक नागमोती यांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात आली तसेच पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, उत्पन्न व जातीचे दाखले आदी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
मेळाव्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पडला.
