
ताडगावच्या पल्ली जंगलातून अटक.
शासनाकडून या चारही नक्षलीवर होते ४० लाख रुपये बक्षीस.
गडचिरोली:- जिल्ह्यातील भामरागड उपविभागात दिरंगी-फुलनार जंगल परिसरात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चकमकीत सी-६० कमांडोचा बळी गेला होता. या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या चार जहाल माओवादी नेत्यांना गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफ च्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली आणि विशेष IG संदीप पाटील व DIG अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटकेत आलेल्यांमध्ये दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सचिव सायलु भुमय्या ऊर्फ रघु, त्याची पत्नी व भामरागड एरिया कमिटीची सचिव जैनी खराटम, तसेच झाशी तलांडी व मनिला गावडे या भामरागड दलमच्या महिला सदस्यांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेले नक्षली
दक्षिण गडचिरोली विभागीय समिती सदस्य सायलू भुमय्या मुड्डेला ऊर्फ रघू ऊर्फ प्रताप ऊर्फ इपा (५५, रा. लिंगापूर, ता. दरपेल्ली, जि. निजामाबाद, तेलंगणा), भामरागड दलमची विभागीय समिती सदस्य व भामरागड एरिया कमिटी सचिव जैनी भीमा खराटम ऊर्फ अखिला ऊर्फ रामे (४१, रा. कंचाला, ता. भोपालपट्टानम, जि. बिजापूर, छत्तीसगड), भामरागड दलम सदस्य झाशी दोघे तलांडी उर्फ गंगू (३०, रा. येचली, ता. भामरागड), मनीला पिडो गावडे उर्फ सरिता (२१, रा. कापेवंचा, ता. अहेरी) अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.
अटकेतील नक्षलवाद्यांचे गुन्हेगारी.
सायलु रघु याच्यावर तब्बल ७७ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये ३४ चकमकी, २३ खून, ७ जाळपोळ यांचा समावेश आहे. तर जैनीवर २९ गुन्हे नोंद असून १८ चकमकी व ४ खून त्यात आहेत. उर्वरित दोन महिलांवरही अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत.
पल्ली जंगल परिसरातून अटक.
भामरागड तालुक्यातील पल्ली जंगल परिसरात हे माओवादी रेकी करत असताना CRPFच्या 09 बटालियन व ताडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने त्यांना संशयास्पद हालचाली करताना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपल्या ओळखी कबूल केल्या.
शासनाने जाहीर केलेली बक्षीस.
या चार माओवादी नेत्यांवर एकूण ४० लाखांचे बक्षीस जाहीर होते.रघुवर २० लाख, जैनीवर १६ लाख तर उर्वरित दोघींवर प्रत्येकी २ लाखांचे बक्षीस होते.
या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले असून, गडचिरोलीत माओवादी विरोधी कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.-
नीलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली.