बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी १ कोटींच्या शेळ्या जंगलात सोडणार- राज्याचे वनमंत्री गणेश नाईक.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला प्रस्ताव.
पुणे:- जिल्ह्यातील काही परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. रात्री 8 नंतर गावी मुलांना घराबाहेर जाऊ न देणे, शेतकऱ्यांनी चारापाणी किंवा जनावरे सांभाळताना अत्यंत खबरदारी घेणे, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीती… अशा स्वरूपाचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एक प्रस्ताव मांडला. बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटी शेळ्या सोडाव्यात. हा उपाय जाहीर होताच पर्यावरणतज्ज्ञ, प्राणीप्रेमी आणि वन्यजीव कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
वनमंत्री नाईक यांनी मांडलेला प्रस्ताव लोकांच्या भीतीचा प्रश्न सोडवण्याच्या हेतूनेच असावा, असे प्राणीप्रेमी मान्य करतात. मात्र हा उपाय नेमका कसा आणि कुठे लागू होणार आहे? याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. वाईल्ड लाईफ क्षेत्रात कार्यरत असलेले आदित्य परांजपे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,लोकांना दिलासा देण्याचा हेतू असला तरी हा उपाय तात्पुरता आहे. बिबट्यांसाठी शेळ्या सोडणे म्हणजे मूळ प्रश्नावर झाक घालण्याचा प्रयत्न आहे. मानव- बिबट्या संघर्ष हा केवळ अन्नाच्या उपलब्धतेवर अवलंबून नाही. यात निवासस्थान, वावर क्षेत्र, वाढती लोकसंख्या आणि व्यवस्थापनाचा अभाव हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
