भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता दूर करून समाजात समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे. राष्ट्राच्या प्रगतीचा पाया बाबासाहेबांनीच घातल्याचे त्यांनी नमूद केले. ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांचे योगदान अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झाले, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते, असे त्यांनी नमूद केले.आगामी काळात चैत्यभूमी परिसरातील स्मारक विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
