‘ड्रॉइंग फॉर चॅरिटी’ अहेरी जिल्हा चित्रकला स्पर्धेत संस्कार पब्लिक स्कूलची आराध्या प्रथम
एटापल्ली : ‘ड्रॉइंग फॉर चॅरिटी’ अंतर्गत आयोजित अहेरी जिल्हा स्तरावरील चित्रकला स्पर्धेत वर्ग 5 ते 8 गटातून संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली येथील कु. आराध्या तुषार पवार हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा व परिसराचा गौरव वाढविला आहे. या स्पर्धेत दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
अहेरी येथील रिपब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित समारंभात गटशिक्षणाधिकारी आयंचवार सर यांच्या हस्ते कु. आराध्याला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, 2024 साली झालेल्या याच स्पर्धेतही आराध्याने प्रथम क्रमांक मिळविला होता. सातत्याने मिळणाऱ्या यशामुळे तिच्या कलागुणांची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
आराध्या ही संस्कार पब्लिक स्कूलमध्ये स्टुडंट चेअरमन म्हणून जबाबदारी पार पाडत असून तिची नवोदय विद्यालय, घोट येथेही निवड झालेली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा दासरवार, वर्गशिक्षक श्री. अंशुल मारगोनवार तसेच संस्कार संस्थेचे संस्थापक श्री. विजय संस्कार यांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले.
संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली येथे नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा, शैक्षणिक उपक्रम आणि परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे समाधान आराध्याचे वडील श्री. तुषार पवार यांनी व्यक्त केले. परिसरात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये संस्कार शाळेचे विद्यार्थी नेहमीच अव्वल ठरत असल्याचे हे यश अधोरेखित करते.
