*गडचिरोली जिल्ह्यात कलम ३७ (१)(३) लागू*
*परीक्षा आणि सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन*
एटापल्ली : गडचिरोली
जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा,तसेच होळी, धुलिवंदन आणि शिवजयंतीसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) लागू करण्यात आले आहे.
हे आदेश २० फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री ००:०१ वाजेपासून ते ६ मार्च २०२६ रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत अंमलात राहतील.
सध्या जिल्ह्यात १० फेब्रुवारीपासून १२ वीची परीक्षा सुरू असून, २० फेब्रुवारीपासून १० वीची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये आणि परीक्षा केंद्रांवर शांतता राहावी हा मुख्य उद्देश आहे.
२ मार्च रोजी होळी,३ मार्च रोजी धुलिवंदन आणि ६ मार्च रोजी तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती आहे.या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असते.
विविध मागण्यांसाठी नागरिक किंवा संघटनांद्वारे धरणे,मोर्चे, सभा किंवा मिरवणुका काढल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
*पोलीस प्रशासनाचे आवाहन:*
“जिल्ह्यातील शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असे पोलीस प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
