उमानूरमध्ये धान सडतेय, प्रशासन झोपेत; गुरांच्या तोंडी शेतकऱ्यांचा घाम!
धान उचल न केल्याने संताप उसळला; डॉ. अजयभाऊ कंकडालवारांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा
अहेरी, प्रतिनिधी :
तालुक्यातील उमानूर येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित अंतर्गत असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आले. मात्र अनेक महिने उलटूनही धानाची उचल न झाल्याने संपूर्ण धान उघड्यावरच पडून असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे.
पावसाचा व उन्हाचा तडाखा सहन करत धान खराब होण्याच्या मार्गावर असून गावातील गुरेढोरे ते खात असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेले धान अशा प्रकारे वाया जात असल्याने परिसरात तीव्र रोष व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या घामाचे अक्षरशः मोल मातीमोल होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी उमानूर येथे धडक भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
स्थानिक शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच टी.डी.सी.चे अधिकारी राजूरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून थेट संपर्क साधून तात्काळ धान उचल करण्याचे व खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे स्पष्ट आणि कडक निर्देश दिले.
या पाहणी दौऱ्यात अजय नैताम (माजी जि.प. सदस्य), भास्कर तलांडे (माजी सभापती, अहेरी), कार्तिक तोगम (माजी उपसरपंच), लक्ष्मीस्वामी अट्टेला, शंकरीताई पोरंतेट (सरपंच, गोविंदगाव), शामराव गावडे, बापू गांदार्ला यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक शेतकऱ्यांनी त्वरित धान उचल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून “शेतकऱ्यांच्या घामाशी खेळ करणाऱ्यांना जाब द्यावाच लागेल,” असा संतप्त सूर उमटत आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
