दिटवाह चक्रीवादळ; श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन सागर बंधू’……
मुंबई:- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दिटवाह चक्रीवादळाचा फटका श्रीलंकेला बसला असून तमिळनाडूमध्येही हवामानात बदल झाला आहे. चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिण भागात आणि कावेरी नदीजवळील जिल्ह्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाने उभारलेल्या आपत्कालीन कामकाज केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना बचाव व मदत कार्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले असून त्या सर्वांना सतर्क राहण्यास सांगितले आहे, अशी माहिती स्टॅलिन यांनी दिली. शासन या आपत्तीला तोंड द्यायला तयार आहे, असे ते म्हणाले.दुसरीकडे, चक्रीवादळामुळे श्रीलंकेत पूर आणि भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या असून त्यामध्ये आतापर्यंत किमान ५६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १२ हजारांपेक्षा जास्त कुटुंबातील जवळपास ४४ हजार लोकांना या चक्रीवादळाचा फटका बसला आहे.
श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताने ‘ऑपरेशन सागर बंधू’ सुरू केले असून त्याअंतर्गत श्रीलंकेला सहाय्य केले जात आहे. नौदलाची विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत आणि लढाऊ जहाज आयएनएस उदयनगिरी यांच्या माध्यमातून श्रीलंकेला मदतसामग्री पाठवण्यात आली. संकटाच्या या क्षणी आम्ही श्रीलंकेबरोबर आहोत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
दक्षिण भागात आणि कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशात रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. मी या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीने बैठक घेतली. त्याआधी गुरुवारीच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत तपशीलवार सूचना देण्यात आल्या आहेत. – एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री, तमिळनाडू
