
*बस स्थानकावर हमाली करून प्रवाशांना सहकार्य करणाऱ्या हमालाचा सत्कार करून पत्रकार दिन साजरा*
*तालुक्यातील पत्रकारांच्या उपस्थितीत कोरची पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांचा पुढाकार*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
मराठी पत्रकार दिनानिमित्त कोरची पोलीस स्टेशन येथे सोमवारी पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कोरची शहरात मागील १७ वर्षापासून बस स्थानकावर प्रवाशांना सेवा देणाऱ्या रामसाय (टोपी) साहाळा रा. नवरगाव आणि पत्रकार दिनाच्या औचित्यसाधून कोरचीत तालुक्यात अनेक वर्षांपासून वार्तांकन करणाऱ्या जेष्ठ पत्रकार बांधवांना पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे यांनी भेटवस्तू देऊन त्यांचं सत्कार केला आहे.
कोरची पोलीस स्टेशन येथील सभागृहात ६ जानेवारी सोमवारी सायंकाळी मराठी पत्रकार दिन निमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरची पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सत्कारमूर्ती हमाल रामसाय (टोपी) साहाळा, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे उपस्थित होते.
कोरची नजीकच्या नवरगाव येथून दररोज दोन किमी पायदळ चालत शहरात येऊन बस स्थानकावर बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सामानांचा ओझं डोक्यावर घेऊन एसटीच्या वर चढवणे व खाली उतरविण्याचे काम मागील १७ वर्षापासून रामसाय (टोपी) हे करीत आहेत विशेष म्हणजे त्यांनी अनेकदा दिव्यांग, अपंग आणि वयोवृद्ध प्रवाशांकडून पैशाची अपेक्षा ठेऊन काम केलं नाही त्यांचं मोफत सामान चढवून व उतरवून घरापर्यंत सोडून देण्याचे काम त्यांनी केला आहे. मात्र स्वताच्या प्रसिद्धीची आवड मनात कधी ठेवली नाही. त्यामुळे पत्रकार दिनाच्या औचित्य साधून येथील पोलीस निरीक्षकानी त्यांचं भेटवस्तू व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.
तसेच कोरची तालुक्यात अनेक वर्षांपासून विविध वृत्तपत्रात, पोर्टलवर वार्तांकन करणारे जेष्ठ वार्ताहर व पत्रकारांनी समाजाला जागृत करण्याचं काम तसंच त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून कुठलीही भीती न बाळगता, कुणाच्याही दबावाखाली न येता काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना डायरी व पेन भेटवस्तू देऊन पहिल्यांदाच पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकाऱ्यानी सत्कार केला आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर नखाते, लालचंद जनबंधू, शालीकराम कराडे, राष्ट्रपाल नखाते, अरुण नायक, सुरज हेमके, राहुल अंबादे, आशिष अग्रवाल, जितेंद्र सहारे, वसीम शेख, श्याम कुमार यादव, प्रशांत कराडे आदी उपस्थित होते कार्यक्रम प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे यांनी केले.