तपासणीत पोलिसांना आढळले चुन्याचे मार्किंग.
भामरागड:- गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम भामरागड येथे दि.16 नोव्हेंबर (शनिवार) रोजी सकाळी 10 ते 11 दरम्यान भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलाच्या ठिकाणी IEd बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेहमी प्रमाणे पोलिस आपल्या गस्तीवर होते. काही पोलिस पर्लकोटा नदीच्या पलीकडील भागात होते. पर्लकोटा नदी पुलाचे काम सुरु असल्याने पुलावर काम करणारे कर्मचारी व मजूर कामावर होते. पोलिसांनी एका ठिकाणी संशयास्पद चुण्याचे मार्किंग पाहिले. पुलावरील कर्मचाऱ्यांना बोलावून ते मार्किंग आपण केले का? असे विचारले असता आम्ही या ठिकाणी मार्किंग केले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला. पोलिसांनी या ठिकाणी तपासणीला सुरूवात केली. तितक्यात अगदी पुलाजवळ त्याच ठिकाणी स्फोट झाला. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.या ठिकाणी पुन्हा एखादी घटना घडण्याची शक्यता विभागाकडून वर्तविली जातं आहे. त्यामुळे बॉम्ब शोधक पथकाद्वारे या ठिकाणी तपासणी सुरु आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भामरागड व आल्लापल्ली मार्गावरील सर्व वाहने थांबवण्यात आली आहेत.