इंदाराम येथे रंगपंचमीचा जल्लोष
माजी जि.प. अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा सोहळा
अहेरी : प्रतिनिधी
तालुक्यातील इंदाराम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. अजयभाऊ कंकडालवार (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक) यांच्या इंदाराम येथील निवासस्थानी ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत रंगोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.
गावातील नागरिक, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना प्रेमाने रंग लावत, पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला. वातावरणात आनंद, उत्साह आणि ऐक्याची भावना ओसंडून वाहत होती.
यावेळी डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थितांना होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देत, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपण्याचे आवाहन केले. “सण-उत्सव हे समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम आहे. सर्वांनी आनंदाने व सौहार्दाने सण साजरे करावेत,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, नरेश गर्गम, राकेश सडमेक, लक्ष्मण आत्राम, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदाराममधील हा रंगोत्सव तालुक्यात विशेष आकर्षण ठरला असून, उत्सवामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
