जितेंद्र सहारे तालुका प्रतिनिधी कोरची
खूणारा गावच्या अश्विनी, नूतन आणि पल्लवी कुमरे यांची एकाचवेळी पोलीस भरतीत निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण
कोरची (प्रतिनिधी) :
जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण गडचिरोली जिल्ह्यातून समोर आले आहे. कोरची तालुक्यातील खूणारा गावातील अश्विनी, नूतन आणि पल्लवी कुमरे या तिन्ही सख्ख्या बहिणींनी पोलीस भरतीत उल्लेखनीय यश मिळवत एकाचवेळी पोलीस सेवेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या साध्या कुटुंबातील या बहिणींनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी जिद्दीने सुरू ठेवली. प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे उच्च शिक्षण घेतले. अश्विनी कुमरे हिने बी.एससी., नूतन कुमरे हिने एम.ए., बी.एड., तर पल्लवी कुमरे हिने बी.ए. पदवी प्राप्त केली आहे. त्यांचा लहान भाऊ उत्सव सध्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.
लहानपणापासूनच पोलीस सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तिन्ही बहिणींनी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर पोलीस भरती परीक्षेत यश संपादन केले. एकाच कुटुंबातील तिन्ही बहिणींची निवड झाल्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
“आम्ही आमच्या मुलींना शिक्षण दिलं आणि त्यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांच्या पालकांनी व्यक्त केली.
याबाबत बोलताना कुमरे बहिणींनी सांगितले की, “पोलीस सेवेत जाण्याचा निर्धार आम्ही आधीपासूनच केला होता. त्यासाठी नियमित सराव, अभ्यास आणि मेहनत घेतली. आज त्या मेहनतीचे फळ मिळाले याचा आनंद आहे.”
एकेकाळी नक्षलवादासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवती आता शिक्षण आणि सरकारी सेवेकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत. कुमरे बहिणींच्या या यशामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांना नवी प्रेरणा मिळणार आहे. कठीण परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश निश्चितच अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
