शेकडो वर्षांची परंपरा पुन्हा उजळली; राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते पवित्र ज्योतीचे पूजन!

शेकडो वर्षांची परंपरा पुन्हा उजळली; राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते पवित्र ज्योतीचे पूजन!

 

५० गावांतील आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग; पारंपरिक नृत्य, गीतगायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी पेरमिली दुमदुमली!

 

पेरमिली (अहेरी) | विशेष वृत्त

शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा आणि आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणारा अहेरी इस्टेटचा पारंपरिक दसरा महोत्सव अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला परिसरातील तब्बल ५० गावांतील आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

 

अहेरी येथे ऐतिहासिक दसरा महोत्सव पार पडल्यानंतर तेथील पवित्र ज्योत अहेरी इस्टेटमधील विविध आदिवासी पट्ट्यांमध्ये नेऊन पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. याच परंपरेनुसार पेरमिली येथे माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते पवित्र ज्योतीचे विधिवत पूजन करण्यात आले. धार्मिक विधी आणि पारंपरिक पद्धतीने उत्सवाचा शुभारंभ झाल्यानंतर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाच्या मंचावर युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम, योगेश तपकीर (पोलीस उपनिरीक्षक, पेरमिली), डॉ. अमोल कुकडकर, बोडाजी गावडे, संजय सडमेक (गडी शेंडा), बालाजी गावडे (अध्यक्ष), प्रमोद आत्राम (उपाध्यक्ष), बंडू तलांडे, संदीप गावडे, निलेश वेलादी (माजी उपसरपंच), अमरनाथ गावडे, विजय आत्राम, लक्ष्मण कुळमेथे, वारलू तलांडे, राजू आत्राम (माजी उपसरपंच), किरण कोरेत, सध्या मडावी, पत्रकार आसिफ खान पठाण, श्रीकांत दुर्गे, महारु गावडे, सुरज आत्राम, डॉ. गणेश मडावी, राजक्का आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय परिसरातील भूमिया, गावपाटील, पारंपरिक पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आदिवासी संस्कृती आणि अस्मिता जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी : राजे अम्ब्रिशराव आत्राम

उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आदिवासी समाजाचे जल, जंगल आणि जमीन यांच्याशी अतूट नाते असून पूर्वजांनी शेकडो वर्षांपासून जपलेल्या रूढी, परंपरा, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक वारसा हीच समाजाची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

आधुनिकतेचा स्वीकार करताना आपल्या मूळ संस्कृतीचा विसर पडता कामा नये. पूर्वजांनी दिलेला अनमोल सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने पुढे येणे आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

पारंपरिक आदिवासी नृत्य आणि गीतगायनाने उत्सवात रंगत

दसरा उत्सवादरम्यान पारंपरिक आदिवासी नृत्य, गीतगायन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक विधी आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर सादर झालेल्या नृत्यांनी उत्सवाच्या आनंदात आणखी भर घातली.

पेरमिली पट्टीतील शेंड्या, गावपाटील, भूमिया तसेच परिसरातील ५० गावांतील आदिवासी बांधवांच्या मोठ्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या संस्कृतीप्रती असलेली श्रद्धा आणि अभिमान व्यक्त केला.

 

शेकडो वर्षांची परंपरा कायम; आदिवासी एकजुटीचा प्रेरणादायी संदेश

अहेरीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवातून प्रज्वलित झालेली पवित्र ज्योत पेरमिलीसारख्या आदिवासी पट्ट्यांमध्ये पोहोचवून शेकडो वर्षांची परंपरा आजही जिवंत ठेवली जात आहे. पवित्र ज्योतीचे पूजन, राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे मार्गदर्शन आणि ५० गावांतील आदिवासी बांधवांची उपस्थिती यामुळे यंदाचा दसरा उत्सव विशेष ठरला.

परंपरेचा अभिमान, संस्कृतीचे संवर्धन, पूर्वजांच्या वारशाचे जतन आणि सामाजिक एकजुटीचा संदेश देणारा पेरमिलीचा पारंपरिक दसरा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रद्धा, परंपरा आणि आदिवासी अस्मितेचा संगम घडविणारा हा सोहळा पेरमिलीच्या सांस्कृतिक इतिहासात अविस्मरणीय ठरला.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या