आष्टीतील कोवे बहीण-भावाची पहिल्या राष्ट्रीय ‘खेलो इंडिया ट्रायबल गेम्स’साठी निवड
गडचिरोली : जिल्ह्यातील आष्टी येथील धनुर्विद्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कु. श्वेता मंजू भास्कर कोवे व स्नेहल मंजू भास्कर कोवे या बहीण-भावाची पहिल्या राष्ट्रीय खेलो इंडिया ट्रायबल गेम्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 28 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान छत्तीसगड येथे आयोजित करण्यात येणार आहे.
कु. श्वेता कोवे या महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असून स्नेहल कोवे हा महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, आष्टी येथे इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. दोघांनीही धनुर्विद्या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले आहे.
या स्पर्धेसाठी अंतिम निवड चाचणी 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडली होती. त्यात उत्कृष्ट कामगिरी करत दोघांची निवड निश्चित झाली.
निवडीबद्दल वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे सचिव बबलू भैया हकीम व सौ. शाहीन हकीम, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलझेले तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई यांनी दोघांचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. श्वेता व स्नेहल यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. श्याम कोरडे, श्री. सुशील अवसरमोल, रोशन सोलखे व कौमुदी श्रीरामवार यांना दिले आहे.
स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या या बहीण-भावाच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील मान उंचावला आहे.
