आष्टीत भव्य हिंदू संमेलन; संत व मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मजागृतीचा संदेश
शोभायात्रा कालिबाडी दुर्गा मंदिरातून प्रारंभ; ग्रामपंचायत रंगमंचावर मार्गदर्शनपर सभा
गडचिरोली (प्रतिनिधी) — सनातन धर्म व भारतीय संस्कृतीला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने आष्टी येथे शुक्रवार, 28 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीच्या भव्य रंगमंचावर भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे.
या संमेलनात परमपूज्य संत श्री मुरलीधर महाराज, इरकॉन मंदिर चामोर्शी कृष्णनगर येथील परमेश्वर दास महाराज तसेच चंद्रपूर विभाग समग्रग्राम प्रमुख जयप्रकाश शेंडे यांच्या उपस्थितीत धर्म, संस्कृती, सामाजिक एकात्मता व राष्ट्रहित या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी शोभायात्रेने होणार असून शोभायात्रा कालिबाडी दुर्गा मंदिर प्रांगणातून प्रारंभ होऊन शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हनुमान मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे श्रीराम मंदिरातून प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत ग्रामपंचायत रंगमंच परिसरात पोहोचणार आहे. त्यानंतर संमेलनस्थळी प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन व सभा आयोजित करण्यात आली आहे.
या संमेलनामुळे आष्टी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक व स्वयंसेवकांकडून नियोजन पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या संमेलनात सकल हिंदू समाजातील बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कालिबाडी दुर्गा मंदिर समिती, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, श्रीराम मंदिर, साई मंदिर, वैनगंगा शिव मंदिर, इरकॉन मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती तसेच छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
