एटापल्लीत ग्रामपंचायत पोटनिवडणूक शांततेत पार
पहिल्यांदाच ईव्हीएमवर मतदान; मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण
राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली

एटापल्ली, दि. 28 एप्रिल – तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी घेण्यात आलेली पोटनिवडणूक मंगळवारी शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली, त्यामुळे मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तालुक्यातील तोडसा, गदेवाडा, वागेंतुरी, हालेवारा, चोखेवाडा, जांबिया, मेंढरी, सेवारी आणि जवेली बु. या ग्रामपंचायतींतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यापैकी गदेवाडा ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 3 मतदान केंद्रांवर, तर वागेंतुरी ग्रामपंचायतीच्या 1 जागेसाठी 1 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. एकूण 4 मतदान केंद्रांवर 8 जागांसाठी मतदान पार पडले.
गदेवाडा ग्रामपंचायतीसाठी 41.48 टक्के, तर वागेंतुरी ग्रामपंचायतीसाठी 56.13 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
एटापल्ली तालुका नक्षलग्रस्त क्षेत्र असल्याने पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानेही व्यापक तयारी केली होती. त्यामुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.
