*धानाचे चुकारे न मिळाल्यामुळे कोरची तालुक्यातील शेतकरी हवालदिल*
*तब्बल 18 कोटींचे चुकारे थकले*
*कोरची :-* तालुक्यातील मुख्य उत्पादनाचे साधन ही भाताची शेती असून आपल्या शेतावर आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई लावून राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांनी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत खरीप हंगामाच्या धानाची विक्री डिसेंबर महिन्यापासून केली असून अजूनही त्यांना त्या धानाचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून आपले व परिवाराचे उदरनिर्वाह करावे तरी कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत आहे.
संबंधित विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे कोरची तालुक्यात आतापर्यंत एकूण 2683 शेतकऱ्यांचे 76,163 .40 क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले असून त्याची किंमत 18 कोटी 4 लक्ष 31 हजार 94 रुपयाचे थकीत असल्यामुळे कोरची तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कोरची तालुक्यात दुसरा कुठलाही जोडधंदा नसून शेतीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता उपासमारीची पाळी येऊन ठेपली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सदर विषय अतिशय गंभीर असून याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे वळती करण्यात यावे अशी मागणी कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
*कोट*
चुकारे देण्याकरिता निधी येण्यास सुरुवात झालेली आहे सोमवारी किंवा मंगळवारी 20 कोटी रुपयांची निधी जिल्ह्यात वळती करण्यात येणार असून लवकरच शेतकऱ्यांचे पैसे त्यांना मिळावे याकरिता सतत पाठपुरावा सुरू आहे
*एस. एस. सांभारे*
*प्रादेशिक व्यवस्थापक*
*गडचिरोली*
