राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पालकत्व घेतलेल्या जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा राम भरोसे? आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न.
गडचिरोली:- राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत चालणाऱ्या आश्रमशाळा बाबत पुन्हा एकदा चिंताजनक घटना समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी निष्काळजीपणा केला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असूनही जिल्ह्यातील आश्रम शाळेत अनेक परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे
भामरागड तालुक्यातील लाहेरी शासकीय आश्रमशाळेत अन्नातून विषबाधा झाल्याने तब्बल ७० विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या घटनेनंतर मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना निलंबित करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी प्रकल्पांतर्गत मुलचेरा तालुक्यातील लोहारा शासकीय आश्रमशाळेत आणखी धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
येथील २४ विद्यार्थिनींनी दोन शिक्षकांवर ‘बॅड टच’ आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले. तक्रारीची तातडीने दखल घेत चौकशी करण्यात आली. गुन्हा निष्पन्न झाल्यानंतर पदवीधर शिक्षक संदीप शिवाजी फड आणि माध्यमिक शिक्षक सुभाष खुशबराव लांडे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी तसेच पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना निलंबितही करण्यात आले आहे.
वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्था, प्रशासनाचे नियंत्रण आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
या पार्श्वभूमीवर आदिवासी पालकांनी आपल्या मुलांना आश्रमशाळेत कशाच्या भरोशावर ठेवावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? वारंवार होणाऱ्या घटनांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर इशारा दिला आहे की, अशी परिस्थिती कायम राहिली तर आदिवासी समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जाईल. “आधी जंगल, जमीन आणि हक्क हिरावले गेले; आता शिक्षणही असुरक्षित होत असेल तर हा अत्यंत गंभीर विषय आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आश्रमशाळांच्या कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेऊन कठोर उपाययोजना कराव्यात, दोषींवर कडक कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस यंत्रणा उभी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
