*कृष्णार येथे व्यसनमुक्ती व आदिवासी संस्कृती संवर्धनाबाबत एटापल्ली पोलिसांचे जनजागृती अभियान*
एटापल्ली (ता. एटापल्ली) :-
एटापल्ली पोलिस दलाच्या वतीने कृष्णार येथे व्यसनमुक्तीबाबत तसेच आदिवासी संस्कृती आणि परंपरा जतन करण्याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या अभियानात पोलीस स्टेशन एटापल्लीचे पोलीस निरीक्षक मा. नागरगोजे साहेब यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यांनी विशेषतः सुगंधित तंबाखू, खर्रा, गुटखा, दारू यांसारख्या व्यसनांच्या आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नागरगोजे साहेबांनी तरुण पिढीने या घातक सवयींपासून दूर राहून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
तसेच पोलीस उपनिरीक्षक मा. मोतीराम मडावी साहेब यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना संबोधित करताना आपल्या संस्कृती, परंपरा, नृत्य, लोककला आणि सण उत्सव हे आपले खरे वैभव असल्याचे सांगितले. त्यांनी आधुनिकतेच्या युगात आपल्या मूळ ओळखीचे आणि परंपरांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात नामदेव हिचामी पाणी पुरवठा सभापती न. पं. एटापल्ली, चमरू हिचामी, किशोर कांदो, बंडु हिचामी सदाशिव हिचामी, भाऊजी हिचामी, ग्रामस्थ, युवक मंडळाचे सदस्य तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. व्यसनमुक्तीचे संदेश फलक, घोषवाक्ये आणि संवादाच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलिस दलाकडून गावकऱ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आणि व्यसनमुक्त आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
