
पेरमिलीतील पिक नुकसान पंचनामे अपारदर्शक व पक्षपाती पद्धतीने केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांकडे केली तक्रार.
पेरमिली(गडचिरोली):– अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र नुकतेच करण्यात आलेले नुकसान पंचनामे हे अपारदर्शक व पक्षपाती पद्धतीने केल्याचा गंभीर आरोप करीत गावातील शेतकऱ्यांनी थेट अहेरी तहसीलदाराकडे तक्रार दाखल केली आहे.
अहेरी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पेरमिली परिसरात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तलाठी व कृषीसेवक यांनी गावातील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता फक्त मोजकेच शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करण्यात आले.इतर नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्यापासून वंचित ठेवले असून त्यांना शासनाच्या मदतीपासून दूर राहावे लागणार असल्याचे म्हटले आहे.
शेतकऱ्यांची तक्रारीत केलेले मुख्य मागणी.
१) पंचनाम्यात समाविष्ट केलेल्या आठ शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी.
२) संपूर्ण पंचनाम्याची चौकशी करावी.
३) पिडीत सर्व शेतकऱ्यांचा पंचनामा नव्याने व पारदर्शकपणे करावा.
४) दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
परिसरातील शेतकऱ्यात संतापाचे वातावरण.
झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पिक पाण्याखाली गेले असून महसूल विभागाकडून पिक नुकसान पंचनामे न झाल्याने गावातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी पेरमिलीचे सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ गावडे, भिऊजी कोडापे, सुनील सोयाम (उपसरपंच, पेरमिली) व परिसरातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी अहेरी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.