“गडचिरोलीत 14 गावांची 3,504 हेक्टर जमीन अधिग्रहणाच्या विळख्यात; विधानपरिषदेत आमदार अभिजीत वंजारी यांचा सरकारला थेट सवाल”
जेएसडब्ल्यू स्टील प्रकल्पासाठी सुपीक शेती जमीन का? ग्रामस्थांचा तीव्र विरोध; पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणी
गडचिरोली : प्रतिनिधी
चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या स्टील प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा विधानपरिषदेत जोरदारपणे उपस्थित झाला. आमदार अभिजीत वंजारी यांनी हा विषय सभागृहात मांडत सरकारला थेट सवाल उपस्थित केला.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या अधिसूचनेनुसार JSW Steel कंपनीच्या प्रस्तावित स्टील प्लांटसाठी चामोर्शी तालुक्यातील 14 गावांमधील सुमारे 3,504 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
आमदार वंजारी यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हा या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 14.48 लाख हेक्टर आहे. त्यापैकी तब्बल 10.98 लाख हेक्टर क्षेत्र वनजमीन आहे. शेतीसाठी उपलब्ध असलेली जमीन केवळ 2 लाख 14 हजार हेक्टर इतकीच आहे. यामधील सिंचनाखालील क्षेत्र देखील अत्यंत मर्यादित असून केवळ 0.67 लाख हेक्टर जमीनच सिंचनाखाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
अशा परिस्थितीत औद्योगिक प्रकल्पांसाठी वारंवार सुपीक शेती जमीनच अधिग्रहित का केली जाते, असा प्रश्न स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असल्याचे वंजारी यांनी सभागृहात सांगितले. सध्या या अधिग्रहणाची सातवी टप्प्याची प्रक्रिया सुरू असून यापूर्वीही अनेक टप्प्यांत अशाच प्रकारे जमीन अधिग्रहित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, चामोर्शी तालुक्यातील संबंधित 14 गावांतील ग्रामस्थांनी जमीन अधिग्रहणाविरोधात ग्रामसभेत ठराव पारित केले आहेत. ग्रामस्थांचा विकासाला विरोध नसून प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल असे आश्वासन यापूर्वी देण्यात आले होते. मात्र अपेक्षित प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला नसल्याची ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर प्रस्तावित जमीन अधिग्रहणाचा पुनर्विचार करून प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधावी, जेणेकरून गावकऱ्यांची सुपीक शेती जमीन वाचेल, अशी मागणी आमदार अभिजीत वंजारी यांनी विधानपरिषदेत केली. तसेच या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी सरकारकडे केली.
मुख्य मुद्दे :
• चामोर्शी तालुक्यातील 14 गावांची 3,504 हेक्टर जमीन अधिग्रहण प्रक्रियेत
• जेएसडब्ल्यू स्टीलच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी जमीन संपादन
• ग्रामस्थांनी ग्रामसभेत अधिग्रहणाविरोधात ठराव पारित
• सुपीक शेती जमीन वाचवण्यासाठी पर्यायी जागेची मागणी
• विधानपरिषदेत आमदार अभिजीत वंजारी यांचा सरकारला सवाल
