शासकीय आश्रम शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींचा दोन शिक्षकांनी केला विनयभंग; मुलचेरा पोलिसांनी दोन शिक्षकांना केली अटक.
गडचिरोली:- काही दिवसापूर्वी भामरागड तालुक्यातील लाहेरी आश्रम शाळेतील विषबाधा प्रकरणात आदिवासी विकास विभागाने मुख्याध्यापक अधीक्षक यांना निलंबित केले होते. त्यानंतर शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी आणि शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारी एक संतापजनक घटना मुलचेरा तालुक्यातील एका शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत घडल्याने जिल्ह्यात खडबड उडाली आहे. शाळेतील दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करून त्यांना बेदम मारहाण केल्याचा कारणावरून मुलचेरा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
जिल्ह्यातील आश्रम शाळेत सतत होणाऱ्या विविध घटनांमुळे आदिवासी विकास विभागात खडबड माजली आहे. जिल्ह्यातील आश्रम शाळेमध्ये चाललंय तरी काय? असा प्रश्न जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांना पडत आहे.
सदर प्रकरणात न्यायालयाने दोन्ही शिक्षकांची रवानगी कोठडीत केली असून या घटनेमुळे आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सुभाष खुशाबराव लांडे (४१) आणि संदीप शिवाजी फड (३६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकांची नावे आहेत. या दोघांनी २० सप्टेंबर २०२५ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींशी वारंवार गैरवर्तन केले. केवळ विनयभंग करून हे शिक्षक थांबले नाहीत, तर त्यांनी विद्यार्थिनींनी परीक्षेची उत्तरे पाहून लिहिल्याचा आरोप करीत त्यांना बांबूच्या काठीने हाताच्या तळव्यावर मारहाण केली. तुमच्या टीसीवर लाल पेनाने सही करून तुमचे करिअर उद्ध्वस्त करेन, तुमच्या पालकांना सांगेन, मी कोणालाही घाबरत नाही, अशा धमक्या देऊन या शिक्षकांनी पीडितांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला होता.
अखेर पीडित विद्यार्थिनींनी या छळाविरुद्ध हिंमत एकवटली आणि सर्व आपबिती कथन केली. याप्रकरणी मुलचेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी शिक्षकांना दुसऱ्याच दिवशी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत
रवानगी झाली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
