*थंडीच्या लाटेत गरजूंना ‘मायेची उब’ – ब्लँकेट वितरण मोहिमेचा शुभारंभ*
कोरची:- जितेंद्र सहारे
थंडीच्या कडाक्यात दुर्गम भागातील गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी उपवन संस्था आणि स्वाभिमान फाउंडेशन कोरची यांच्या वतीने ‘मायेची उब’ ब्लँकेट वितरण मोहीम २०२५-२६ चा शुभारंभ आज दि. ०२/०१/२०२६ ला करण्यात आला. गेल्या वर्षी या मोहिमेअंतर्गत नागपूर, पुणे, मुंबईसह विविध ठिकाणांहून दानकर्त्यांच्या उदार सहकार्याने अनेक गरजू कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले होते. त्याबद्दल सर्व दानकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
यंदाही थंडीच्या प्रादुर्भावात गरजू बांधवांना मदत करण्यासाठी अनेक दानकर्त्यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या भरभरून साथीमुळे ही मोहीम आजपासून सुरू झाली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजा पडियालजोब येथील तहसील कार्यालय, कोरची अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान २०२५-२६ अंतर्गत करण्यात आली.
कार्यक्रमाला नायब तहसीलदार ज्योती गोंधळे, निरीक्षण अधिकारी अशोक कुथे, ग्रामसभा अध्यक्ष राजाराम नैताम, उपकृषी अधिकारी ईश्वरदयाल पाथोडे, स्वाभिमान फाउंडेशनचे संस्थापक अविनाश हुमणे, सहसचिव अंकुश हुमणे, तेजस गोठे तसेच पडयालजोग, मुरकुटी, मयालघाट व डाबरी या गावांतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
या मोहिमेद्वारे कोरची तालुक्यातील दुर्गम भागातील थंडीने त्रस्त असलेल्या अनाथ, अपंग, वयोवृद्ध गरजूंना ब्लँकेटचे वाटप करून त्यांना ‘मायेची उब’ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. स्वाभिमान फाउंडेशनचे संस्थापक यांनी सांगितले की, दानकर्त्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबविली जाणार असून, अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल.
सर्व दानकर्ते, सहभागी अधिकारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम अधिक प्रभावी होण्यास मदत होत आहे.
