सोशल मीडियातून मैत्री; पुण्यातील तरुणीला चुकीचा पत्ता देऊन तीन दिवस गल्लोगल्ली फिरविले.
कोल्हापूरकरानी वाचविले.
पुणे/कोल्हापूर:- सोशल मीडियातील मैत्रीतून पुण्यातील घरदार सोडून कोल्हापुरात आलेल्या तरुणीला मित्राने चुकीचा पत्ता देऊन फसवले. नैराश्याने खचलेल्या अवस्थेत ती कसबा बावड्यातील पाटील गल्लीच्या कोपऱ्यावर रडत बसली होती. स्थानिक तरुणांनी तिच्याशी संवाद साधून शाहूपुरी पोलिसांना कळवले. कसबा बावड्यातील तरुणांचे प्रसंगावधान आणि शाहूपुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे संबंधित तरुणी सुखरूप घरी पोहोचली. कोल्हापूरकरांची माणुसकी दाखवणारी ही घटना मंगळवारी (दि. ३०) दुपारी घडली.कसबा बावड्यातील पाटील गल्लीच्या कोपऱ्यावर १९ वर्षीय तरुणी रडत बसली होती. बराच वेळ एकाच ठिकाणी विमनस्क अवस्थेत बसलेल्या तरुणीला पाहून याच परिसरातील टिपू मुजावर आणि ओंकार पाटील या तरुणांना शंका आली. त्यांनी जवळ जाऊन विचारपूस केली. तिच्याकडे ना मोबाइल, ना पैसे होते, विश्वास संपादन करून रडण्याचे कारण विचारल्यावर ती बोलती झाली. सोशल मीडियातील मित्राने तिला भूलथापा देऊन कोल्हापूरला बोलवले होते.
चार दिवसांपूर्वी ती घर सोडून बाहेर पडली. तीन दिवस तो चुकीचे पत्ते देऊन तिची फरपट करीत होता. मंगळवारी त्याने कसबा बावड्यातील पत्ता देऊन तिला भेटायला बोलावले होते. दोन तास पायपीट करूनही त्याची भेट झाली नाही. अखेर कंटाळून पाटील गल्लीच्या कोपऱ्यावर थांबल्याचे तिने सांगितले.मित्राकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ओंकार पाटील आणि टिपू मुजावर यांनी तिला आधार दिला. तिच्या आईचा मोबाइल नंबर मिळवून त्यावर कॉल केला. माय-लेकींचे बोलणे घडवले. मुलीला सुरक्षित ठेवण्याची विनवणी तिच्या आईने केली. कसबा बावड्यातील तरुणांनी तिच्या आईलाही धीर देऊन या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. काही वेळात पुणे पोलिसांचा कॉल मुजावर याच्या मोबाइलवर आला. चर्चेनुसार तरुणीचा ताबा शाहूपुरी पोलिसांकडे दिला.रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात मंगळवारी रात्री उशिरा संबंधित तरुणीचे नातेवाइक शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर जबाब नोंदवून पोलिसांनी तरुणीचा ताबा तिच्या नातेवाइकांकडे दिला. तत्पूर्वी जेवण, चहा देऊन तिचे समुपदेशन केले. यामुळे तिला आधार मिळाला. नराधमांनी एकट्या तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेतला असता तर अघटित घडले असते. सुदैवाने ती कसबा बावड्यात पोहोचली आणि तिची फरपट थांबली. या घटनेने सोशल मीडियातील मैत्रीचा पोकळपणा स्पष्ट झाला.
