
अनखोडा येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
चामोर्शी : तालुक्यातील अनखोडा येथील बौद्ध समाज नगर कमेटी यांच्या वतीने “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती” उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मराव शेडमाके शिक्षक यांनी उपस्थित राहून सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
धर्मराव शेडमाके यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक क्रांतीतील महत्त्व आणि म. फुले यांच्या तीन पत्रातील मजकूर आणि आजच्या संदर्भातील उपयुक्तता सांगितली तसेच स्त्रीसक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांवर सखोल व्याख्यान दिले. त्यांनी सावित्रीबाईंच्या विचारांची आजच्या काळातील महत्त्वपूर्ण आवश्यकता स्पष्ट केली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून व बुद्ध वंदनेनी झाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
धर्मराव शेडमाके शिक्षक यांच्या कडून अनखोडा येथील वाचनालयाला पुस्तके भेट दिली तसेच सक्षम युवा संघटना अनखोडा यांच्या वतीने हनुमान मंदिर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते