राकेश तेलकुंटलवार
एटापल्ली | प्रतिनिधी
संस्कार संस्था एटापल्ली या सामाजिक संस्थेला अलीकडेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. या भेटीत मान. रवींद्रजी कर्वे (संस्थापक, विद्यार्थी विकास योजना मुंबई), अरुणजी करमरकर (माजी संपादक, तरुण भारत ठाणे), डॉ. मुरलीधर चांदेकर (माजी कुलगुरू अमरावती व सध्या NAC कमिटी सदस्य), डॉ. चंद्रशेखर भुसारी (माजी PRO VC गडचिरोली, नागपूर) तसेच श्री भूपेंद्रजी शहाणे (जनरल मॅनेजर, टेक्सटाईल मिल, वर्धा) सहभागी झाले होते.
एटापल्ली सारख्या दुर्गम भागात संस्था मागील २० वर्षांपासून शिक्षण, आरोग्य व स्वयंरोजगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेच्या प्रभावी कामामुळे प्रभावित होऊन मान्यवरांनी संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना तसेच शाळेला भेट दिली. एटापल्लीसारख्या आदिवासी व दुर्गम भागात संस्था राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थी विकास योजनेअंतर्गत यावर्षी वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच NITसारख्या विविध क्षेत्रातील ६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात आली असून आणखी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संस्थेने दिली. भेटीदरम्यान कमवा व शिका योजना, वर्षभर पाणपोई, बाळंतवीडा उपक्रम, शैक्षणिक दत्तक योजना, रुग्णसेवा, गडचिरोली येथील संस्कार अभ्यासिका, शेतकऱ्यांसाठी ग्रामनाथ प्रकल्प तसेच एटापल्ली येथील नावाजलेली संस्कार पब्लिक स्कूल एटापल्ली यांची पाहणी करण्यात आली.
संस्थेने शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत आतापर्यंत ४० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनविले आहे. यापैकी अनेक विद्यार्थी आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. तसेच नुकतेच C60 मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी आणि उन्नत शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांशी मान्यवरांनी संवाद साधला.
कोणत्याही प्रसिद्धी किंवा परताव्याची अपेक्षा न ठेवता श्री विजय संस्कार व पूजा संस्कार यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी व समाजासाठी आदर्श असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. गडचिरोली जिल्हा मधील दुर्गम भागात संस्था करत असलेले कार्य इतरांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
