*सेवानिवृत्त शिक्षक अतुल येलमुले यांचा सत्कार*..
तालुका प्रतिनिधी चामोर्शी:
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली अंतर्गत भिसी समूहाच्या परंपरेनुसार सेवानिवृत्त शिक्षक अतुल येलमुले यांचा भावपूर्ण व सन्मानपूर्वक सत्कार सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम चामोर्शी येथील साधुबाबा कुटीजवळील हनुमान मंदिराच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
या प्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुनघाडकर, जिल्हा संघटक सचिव कालिदास बन्सोड यांची प्रमुख उपस्थिती होती. येलमुले सरांच्या प्रदीर्घ, निष्ठावान व विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक सेवेस उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला.
कार्यक्रमात बोलताना संजय कुनघाडकर यांनी सांगितले की, “अतुल येलमुले यांनी शिक्षक म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. त्यांचे कार्य नव्या पिढीतील शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे.”
तर कालिदास बन्सोड यांनी शिक्षक संघटनेच्या कार्यात येलमुले सरांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्कारप्रसंगी येलमुले यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी संघटनेचे, सहकारी शिक्षकांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानत, सेवानिवृत्तीनंतरही शैक्षणिक व सामाजिक कार्याशी जोडून राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमाला भिसी समूहातील जिल्हा उपाध्यक्ष संजय कुनघाडकर, जिल्हा संघटक सचिव कालिदास बन्सोड, जिल्हा सदस्य विनोद सालेकर, तालुका कार्यवाह प्रोपेश्वर लडके, तालुका कार्याध्यक्ष संजय आलेवार, कोषाध्यक्ष अरविंद कुनघाडकर, संतोष बोडुकवार, संतोष चावरे,सौ.स्मीता चट्टे,किसनदेव टिकले,रुपेश अमलपुरीवार,रुषीदेव वासेकर, तथा समस्त शिक्षक बांधव, संघटनेचे पदाधिकारी व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम सौहार्दपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
