
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘ lloyds CLG Grant’ ( लॉयड्स सिएलजी शिष्यवृत्ती) अंतर्गत विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण
चंद्रपूर: शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीचे एक उत्कृष्ट उदाहरण सादर करत, लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘ लॉयड्स सिएलजी शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेत अव्वल आलेल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुस येथील प्रांगणात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करून झाली. कंपनीचे युनिट हेड, श्री. वाय.जी.एस. प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर, ‘ लॉयड्स सिएलजी शिष्यवृत्ती’ योजने अंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बारावीच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ऋषिकेश संजय मिश्रा, शिद्रा खान अफसर खान पठाण , पल्लवी झाडे , निर्जल सुनील येरणे , वेदिका मनोज गुंडो या पाच विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी करण्यात आली होती. त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशाने, त्यांना प्रत्येकी एक लॅपटॉप प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. प्रसाद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचा मुख्य उद्देश समाजातील वंचित घटकांना मदत करणे आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे. ‘ लॉयड्स सिएलजी शिष्यवृत्ती’ हा त्याच दिशेने टाकलेला एक महत्त्वाचा टप्पा आहे. या लॅपटॉपमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले शिक्षण अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यास मदत मिळेल, अशी आशा आहे.”
या सोहळ्यात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत पुरी, मुकेश भेलावे आणि विद्या पाल यांच्यासह कर्मचारी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करणारा नव्हता, तर समाजाप्रती असलेली लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनची कटिबद्धता देखील दर्शविणारा होता. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे इतर संस्थांनाही शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या वर्षी ‘ लॉयड्स सिएलजी शिष्यवृत्ती’ साठी एकूण १४७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, या सर्व विद्यार्थ्यांची महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांनाही लॅपटॉप व शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार असल्याचे श्री. प्रसाद यांनी सांगितले.
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन ही लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची सामाजिक जबाबदारी (CSR) पाहणारी शाखा आहे, जी शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवते. ‘ लॉयड्स सिएलजी शिष्यवृत्ती’ हा त्यातील एक महत्वाचा भाग असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला मदत करत राहण्याचा निर्धार फाउंडेशनने व्यक्त केला आहे.