गडचिरोली पोलीस भरती परीक्षेच्या तारखा जाहीर; उमेदवारांनी सावध राहावे
गडचिरोली, प्रतिनिधी :
अंतर्गत पोलीस शिपाई भरती 2024-25 (प्रत्यक्ष भरती 2026) साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून उमेदवारांनी त्यानुसार तयारी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चालक पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा दिनांक 18 मार्च 2026 रोजी, तर पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा दिनांक 22 मार्च 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेसाठीचे हॉल तिकीट उमेदवारांना पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांनी वेळेत हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची छापील प्रत सोबत ठेवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या आमिष, प्रलोभन किंवा फसवणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था भरतीसंदर्भात पैसे किंवा प्रलोभन देण्याचा प्रयत्न करत असल्यास त्वरित तक्रार करण्याचे सांगण्यात आले आहे.
अशा प्रकारची माहिती मिळाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्षाच्या 8806312100 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
