
नागपूर:- संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या आणि देशाच्या पंतप्रधानाच्या पाठीशी आहे. त्यामुळे केवळ शहरात किंवा मोठ्या गावातच नाही, तर ग्रामपंचायत स्तरावरही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे, हे आज दर्शवलं गेलंय. किंबहुना हेच सर्वत्र पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर खापरखेडा येथे तिरंगा यात्रा काढली गेली. अतिशय भव्य अशी तिरंगा यात्रा खापरखेडा येथे काढण्यात आली.
आशिष देशमुख यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना आमंत्रित केलं होतं. कारण इथे पक्षाचा विषय नाही, तर ही भारताची तिरंगा यात्रा आहे. आज भारताची डिफेन्स कॅपॅबिलिटी पाकिस्तान पेक्षा चार ते पाच पट जास्त आहे. सैन्य क्षमता पाहता जगातील पहिल्या पाच मध्ये भारताचा समावेश आहे. पाकिस्तानने गुडघे टेकल्यावर भारताने युद्धविराम केलंय. त्यामुळे ‘सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान...’ असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकड्यांना खडे बोल सुनावले आहे. जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापरखेडा या गावात आज (18 मे) तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी ही तिरंगा यात्रा आयोजित केली असून या तिरंगा यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले आहेत. खापरखेडा येथील अन्नामोड या चौकातून ही तिरंगा यात्रा सुरू झाली असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुमारे एक किलोमीटर या यात्रेत सहभागी झाले आहेत. तिरंगा यात्रा संपुष्टात आल्यानंतर एक छोटी सभा झाली. त्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
भारतीय सैन्य जगात भारी
आज भारताची संरक्षण क्षमता ही पाकिस्तानपेक्षा पाच पटांनी अधिक आहे. आपल्या सैन्याची क्षमता पाहता जगातील पहिल्या पाचमध्ये भारताचा समावेश आहे. पाकिस्ताननं गुडघे टेकल्यावर भारतानं युद्धविराम केला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये नागपूर मेड शस्त्र
ऑपरेशन सिंदूर’मध्ये नागपूरात तयार झालेल्या शस्त्रांचा वापर करण्यात आला. या विषयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. आपला वॉर डॉमिनन्स युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहायला मिळालं. हे आपण ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ मध्ये बनलेल्या शस्त्रांमुळं करू शकलो. पंतप्रधान २०१४ मध्ये ‘मेक इन इंडियाचा’ नारा द्यायचे, तेव्हा लोक याला जुमला असल्याचं म्हणत होते. मात्र, आता इतर देश आपल्याला शस्त्रांची मागणी करत आहेत, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तुर्कीच्या विरोधात भारतीयांचं पाऊल
आपल्या संरक्षण उत्पादनांची मागणी जग करत आहे. देशाचं संरक्षण करण्यासाठी सर्वात अद्यावत शस्त्रास्त्र हे भारताकडं आहेत, हे जगाला कळालं आहे. तुर्क सारखा देश दहशतवादाला पाठिंबा देतोय. हा मानवताविरुद्धचा अपराध आहे. त्या विरोधात भारतीयांनी व्यवहार करण्यास नकार दिला. भारतीय नागरिकांच्या या निर्णयाचं स्वागत करतो,” असं म्हणत त्यांनी देशवासियांचे आभार मानले.