
कोरची तालुक्यातील घटना.
गडचिरोली:- जंगलात तेंदूपाने तोडणाऱ्या मजुरांवर रान डुक्कर व अस्वलाचे हल्ले सुरु असतानाच कोरची तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावरील कैमूल येथील एका मूकबधीर मजुराला विषारी सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला.जगनलाल सुदाराम मेश्राम (वय ५३) असे मृत मजुराचे नाव आहे. या घटनेने मेश्राम कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे.
सध्या कोरची तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिवाची पर्वा न करता लोक जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जात आहेत. मागील आठवड्यात चार ते पाच जणांना रानडुकर आणि अस्वलाने चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. पहाटेलाच जगनलाल मेश्राम हा तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेला होता. पाने तोडण्यासाठी वाकताच विषारी सापाने त्याच्या पायाला दंश केला. परंतु मूकबधीर असल्याने तो आरडाओरड करुन कुणाची मदत मागू शकला नाही. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत तो घरी आला. हातवारे करुन त्याने पत्नी, मुलगा आणि तिन्ही मुलींना आपबिती सांगितली. त्याच्या भाषेवरुन विषारी सापाने दंश केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जगनलाल याला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे ठरविले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
कमवता गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
तेंदूपत्ता संकलनासाठी गोरगरीब नागरिक जंगलात जातात. यातून मिळणाऱ्या मजुरीच्या पैशातून ते पावसाळ्याच्या दिवसांत आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करतात. शिवाय मुलांचे शिक्षण, शेती आणि कर्जाची परतफेडही करतात. परंतु, जंगलात असताना वन्यप्राण्यांचे हल्ले किंवा सर्पदंशाचा सामना त्यांना करावा लागतो. जगनलालही असाच जीवन जगला. तो अत्यंत मेहनती व शांत स्वभावाचा होता. दरवर्षी तेंदूपत्ता तोडण्यासाठी व घरातील आणि शेतातील कामे करण्यासाठी त्याची पत्नी व मुले त्याला सहकार्य करायचे. तो कुटुंबाचा मोठा आधार होता. परंतु त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. तेंदुपत्ता कंत्राटदाराने कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे