कालवा स्वच्छता अभियानाचा शुभारंभ; दिना प्रकल्प कालव्यांना मिळणार नवसंजीवनी
पाटबंधारे विभाग, प्रभू फाउंडेशन व कन्नमवार पाणी वापर संस्थेचा संयुक्त पुढाकार — शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना दिलासा
▶ चामोर्शी (ता. प्र.) :
गत पाच दशकांहून अधिक काळ गाळ आणि कचऱ्यामुळे अडथळा निर्माण झालेल्या दिना प्रकल्पाच्या कालव्यांना अखेर मोकळा श्वास मिळणार आहे. पाटबंधारे विभाग, प्रभू फाउंडेशन आणि कन्नमवार पाणी वापर संस्थेच्या संयुक्त पुढाकारातून कालवा स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
दिना प्रकल्प उभारून ५२ ते ५५ वर्षे उलटून गेली असली तरी कालव्यांची दुरवस्था कायम होती. परिणामी शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात गाळ उपसा मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पाण्याची वहन क्षमता वाढणार
या कामामुळे कालव्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढणार असून भविष्यात पाझर थांबवण्यासाठी सिमेंटीकरणाचा प्रस्तावही आहे. त्यामुळे प्रकल्पाची कार्यक्षमता वाढून शेतीला नियमित पाणीपुरवठा शक्य होणार आहे.
उन्हाळी हंगामातील पिकांना दिलासा
गाळ उपसा केल्यामुळे साठवण क्षमता वाढेल आणि उन्हाळी हंगामात पिके घेणे सुलभ होईल. कालव्यांतून पूर्ण क्षमतेने पाणी वाहिल्यास परिसरातील तलाव पुनरुज्जीवित होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला कन्नमवार पाणी वापर संस्था अध्यक्ष प्रा. प्रदीप भांडेकर, सचिव संजय लटारे, सामाजिक कार्यकर्ते राजू धोडरे तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गट प्रमुख सुरज नैताम, शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन
राज्यातील नद्या आणि कालव्यांमधील गाळ काढण्याच्या मोहिमेला गती देण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेचा उल्लेख करत, शेतकरी व ग्रामस्थांनी पाणीपट्टीचा योग्य वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन संस्था अध्यक्ष प्रा. भांडेकर यांनी केले.
