
अवैध दारू विक्रेत्यांच्या अंत्यसंस्कारालाही कोणी जाणार नाही; मन्नेराजाराम गावातील अख्या गावकऱ्यांनी घेतला दारूबंदीचा ठराव.
भामरागड(गडचिरोली):- गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही अवैध मार्गाने बनावटी दारूची विक्री सुरू असते. या दारूमुळे अनेकांचे घरे उध्वस्त होत आहेत.अनेक गावागावात दारू विक्रेत्यांची संख्या व पिणाऱ्यांची संख्या वाढल्याने महिलांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या विरोधात भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम मन्नेराजाराम गावातील महिलांनी व नागरिकांनी दारूबंदीच्या दिशेने ठोस पाऊल उचलत ग्रामसभेत महत्त्वाचा ठराव करत अवैध दारू विक्रेतांना दणका दिला आहे. या ठरावात मोठ मोठे निर्णय घेण्यात आले. यात गावाकऱ्यांना अवैध दारू विक्रेत्याच्या अंत्यसंस्कारातही सहभागी होऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे. मुक्तीपथ गाव संघटना, ग्रामपंचायत, पेसा ग्रामसभा, पोलीस विभाग, गोटुल समिती, मुक्तीपथ-शक्तीपथ महिला संघटना, युवक संघटना तसेच शेजारच्या येचली आणि बामनपल्ली गावातील पदाधिकारी यांच्या संयुक्त पुढाकारातून हा ठराव घेण्यात आला. यामध्ये दारू विक्रीवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असून विक्री करणाऱ्यांवर २० हजार रुपयांचा दंड आकारण्याचे ठरविण्यात आले आहे. दारूबंदीच्या अंमलबजावणी साठी गावकऱ्यांनी जनजागृती रॅलीचे आयोजन केले.
विशेष म्हणजे, दारू विक्रेत्यांना शिक्षा देण्याऐवजी गांधीगीरीचा मार्ग स्वीकारण्यात आला. पुष्पगुच्छ देऊन त्यांना समज देण्यात आली.या निर्णयाला पोलीस विभागाने पाठिंबा दिला आहे. ग्रामसभेच्या निर्णयाला न्याय्य मानून दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास प्रशासनही तत्पर राहील, असे आश्वासन पोलीस विभागाकडून देण्यात आले.
यावेळी सभेला इंदरशाह मडावी, नीला किन्नाके प्रेरिका मुक्तीपथ, अनिल मडावी, कृष्णा सिडाम पोलीस पाटील, राजेश मडावी, अजय सिडाम, महिला बचत गट, बामनपल्ली व येचली गावातील नागरिक, गोंडवाना गोटूल समिती, व्यापारी वर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
ठरावात घेतलेले महत्त्वाचे मुद्दे
१) दारू विक्रेत्यांच्या शेतात गावकरी काम करणार नाहीत.
२) दारू विक्रेत्यांना कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घेणार नाही.
३) दारू विक्रेत्याच्या घरी अंत्यसंस्कारालाही कोणी जाणार नाही.
४) दोन दिवसांनंतर गाव संघटना व ग्रामस्थ मिळून दारू विक्रेत्यांचा शोध घेऊन त्याच्या घराची झडती घेणार.
५) दारू साठा आढळल्यास कारवाई करून ग्रामसभेत दंड आकारला जाईल.