
हप्ता दे अन् बायको ने… कर्जाचे हप्ते फेडलं नाही म्हणून बँकेवाले बायकोलाच घेऊन गेले…
उत्तर प्रदेशातील झाशी येथील मायक्रो फायनान्स बँकेतील प्रकार.
उत्तर प्रदेश/झाशी:- पैशांचे लोन घेताना तारण म्हणून बँकेकडे काही वस्तू तारण ठेवावी लागते. कर्जाचे हप्ते चुकवू शकले नाहीत तर बँक तारण म्हणून ठेवलेली ती गोष्टच जप्त करते, मग ते घर असू शकतं किंवा सोनं अथवा कार वगैरे. पण बँकवाल्यांनी एखाद्या जिवंत व्यक्तीवर, तेही एखाद्या महिलेवरच जप्ती आणून तिला सोबत नेल्याचा प्रकार तुम्ही कधी ऐकला आहे का ? नाही ना, पण असं आता प्रत्यक्षात झालं आहे, तेही आपल्या भारत देशातच. उत्तर प्रदेशातील झाशी मध्ये बँकवाल्यांची गुंडगिरी दिसून आली. तेथे खाजगी बँकेने कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. कर्जाचा हप्ता न भरल्यामुळे, एका खाजगी मायक्रो फायनान्स बँकेने एका महिलेला 5 तास ओलीस ठेवल्याचा आरोप आहे. हप्ता दे आणि बायकोला ने, असं तिच्या पतीला सांगण्यात आलं अशी माहितीही समोर आली आहे.हे प्रकरण बमहरौली गावातील आझाद नगर परिसरातील एका खाजगी गट कर्ज देणाऱ्या बँकेशी संबंधित आहे. येथे, पूंछ येथील बाबाई रोड येथील रहिवासी रवींद्र वर्मा यांच्या पत्नी पूजा वर्मा यांना सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून जबरदस्तीने बँकेत बसवण्यात आलं,असा आरोप आहे. पैसे द्या, तरच तुम्हाला तुमची पत्नी मिळेल – असं स्पष्ट उत्तर त्या महिलेच्या पतीला, रविंद्रला बँकेत पोहोचल्यावर देण्यात आलं. ते ऐकून तो हबकलाच, रवींद्रने तिथे खूप विनवणी केली, पण बँक कर्मचाऱ्यांनी जराही दया दाखवली नाही. शेवटी, हताश होऊन रवींद्रने 111 नंबरवर फोन केला. पोलिस येताच बँक कर्मचाऱ्यांचे चेहरे पडले आणि महिलेला बँकेतून घाईघाईने बाहेर काढण्यात आले.