ग्रामपंचायतींवर शेकापचा लाल बावटा फडकविण्यासाठी तयारी करा – भाई रामदास जराते
गडचिरोलीत शेकाप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक; ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्यावर भर
गडचिरोली :
ग्रामपंचायती या गावाच्या स्थानिक विकासाचे प्रभावी माध्यम असल्याने येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकविण्याचे ध्येय ठेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक मजबुतीसाठी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या गडचिरोली येथील कार्यालयात तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची संघटन बांधणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विविध स्थानिक व शेतकरी प्रश्नांवर संघटित लढा उभारण्याचे आवाहन केले.
तालुक्यात शासनाने काॅर्पोरेट कंपन्यांसाठी एमआयडीसी घोषित करताना शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने संपादित होऊ नयेत, यासाठी नव्याने प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्रात ग्रामपंचायत व ग्रामसभांनी विरोधाचे ठराव करावेत, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनींचे बळजबरीने भूसंपादन करण्यास कारणीभूत ठरत असलेल्या लोह खाणींविरोधातील संघर्षात तालुक्यातील जनतेचा मोठ्या संख्येने सहभाग वाढविण्याचेही ठरविण्यात आले.
याशिवाय विधवा, निराधार व वयोवृद्धांच्या पेन्शन योजनांमध्ये वाढ करणे, अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारणारे स्मार्ट मीटर रद्द करणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन नवीन पीककर्जाची तातडीने अंमलबजावणी करणे, तसेच वेळेत व मुबलक प्रमाणात बी-बियाणे आणि रासायनिक खते उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन उभारण्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. या सर्व मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने युवकांना शेतकरी कामगार पक्षाशी जोडण्याचे काम करावे, असे आवाहनही करण्यात आले.
बैठकीला पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, महागू पिपरे, उमाजी मुनघाटे, किसन साखरे, दादाजी कांबळे, राकेश भोयर, आशिष मेश्राम, शालिकराम भोयर, रुमाजी मेश्राम, दीपक मानकर, राजू जराते, प्रदीप मेश्राम, ताराचंद जेंगठे, आनंदराव मेश्राम, डोनूजी साखरे, रामदास दाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
