
सौ.निलिमाताई बंडमवार
मुख्य संपादक
गडचिरोली:- शिक्षणाचा दर्जा न सांभाळणाऱ्या शिक्षकांना आधी 6 महिने प्रशिक्षण देणार. त्यातूनही दर्जा सुधारला नाही तर अशा शिक्षकांचा 50 टक्के पगार कापणार.तरीही दर्जा सुधारला नाही तर सेवेतून कमी करणार असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. पुण्यात आयोजित एका शिक्षण परिषदेत ते बोलत होते.शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.
*शिक्षक व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार.*
“शिक्षक समाधानी असतील तरच ते विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देऊ शकतील.पुढील काळात शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर सर्वांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार आहे. आठवीपर्यंत परीक्षा नाही यामुळे मुलं निर्धास्त राहतात.त्याला गणित, विज्ञान, इंग्रजी येतं की नाही याची चिंता कोणी करत नाही. यापुढे शिक्षकांना ही मुभा राहणार नाही.अनेक शिक्षकांना लाख, सव्वा लाख पगार असतो. मग मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे.आतापर्यंत ही जबाबदारी ठरवण्यात आली नव्हती,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “मी असं देखील सर्क्युलर काढलं आहे की, ज्या शिक्षकांना शिकवता येत नसेल त्यांना 6 महिने पूर्ण पगार देऊन प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतरही बदल झाला नाही तर 50 टक्के पगार कमी करणार आणि तरीही बदल झाला नाही तर सेवेतून दूर करणार. सेवेतून दूर कऱणं हेतू नाही. मुलांचं शिक्षण हे शिक्षण खात्याचं अंतिम उद्दिष्ट होतं. आतापर्यंत हे शिक्षण नाही तर शिक्षक खातं होतं. त्यांच्या समस्या घेऊन सरकारकडे जात होते. त्यांच्या समस्या वर्षभरात सोडवण्यात आल्या आहेत. शिक्षकानं एकाच ठिकाणी राहून शिक्षणाचं काम करावं.शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर भर, जे शिक्षक यात कमी पडतील त्यांच्यावर कारवाई करणार”