गणेशपूर येथील सार्वजनिक विहिरीवरील अतिक्रमणा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण; जनसेवक पवन मस्के यांचा जाहीर पाठिंबा.
भंडारा: लगतच्या गणेशपूर येथील गांधी वॉर्डातील पुरातन सार्वजनिक विहिरीभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे ग्रामस्थांना पाणी भरण्यास व येण्या-जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. या गंभीर प्रश्नावर वारंवार दाद मागूनही जिल्हा प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने अखेर दिनेश चिंतामण भुरे यांनी सहकाऱ्यांसह १६ मार्च २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
अतिक्रमणाबाबत सतत पाठपुरावा करूनही कारवाई शून्य
मागील मे २०२५ पासून दिनेश भुरे आणि इतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत गणेशपूर व प्रशासनाकडे या अतिक्रमणाबाबत सतत पाठपुरावा केला होता. मात्र ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता शांतीच्या मार्गाने उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला मंगळवार ला १७ मार्च रोजी जनसेवक तथा समाजसेवक पवन मस्के यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
जनसेवक पवन मस्के यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा
पवन मस्के यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी भंडारा यांच्याशी थेट चर्चा करून विनाविलंब तोडगा काढण्याची मागणी केली आहे. जर या समस्येवर त्वरित ठोस कार्यवाही झाली नाही तर सर्व जनतेला सोबत घेऊन तीव्र ‘जन आंदोलन’ छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या उपोषण प्रसंगी जनसेवक पवन मस्के, दिनेश भुरे यांच्यासोबत कमलेश हरडे, भावेश नागपुरे, कैलास सोनकुसरे, गजानन मेहर व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.
