गडचिरोलीत छत्रपती सेनेच्या ताफ्यात फॉर्च्यूनर दाखल; दुर्गम भागातील जनसंपर्क व संघटनबांधणीला मिळणार नवी गती
संस्थापक अध्यक्ष अरविंदभाऊ कात्रटवार यांचा पुढाकार; ग्रामीण भागात संघटनेची ताकद वाढविण्याचा संकल्प
गडचिरोली, प्रतिनिधी :
गडचिरोलीसारख्या विस्तीर्ण व दुर्गम जिल्ह्यात छत्रपती सेनेचा जनसंपर्क अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी तसेच संघटनबांधणीला बळकटी देण्याच्या उद्देशाने छत्रपती सेनेच्या ताफ्यात नव्या फॉर्च्यूनर वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमाचा पुढाकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंदभाऊ कात्रटवार यांनी घेतला.
जिल्ह्यातील दुर्गम गावांपर्यंत पोहोचून संघटनेचे ध्येय, धोरणे व सामाजिक कार्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नव्या कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे आणि विविध कार्यक्रमांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी हे वाहन उपयोगी ठरणार आहे. या वाहनामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील जनसंपर्क मोहिमेला अधिक वेग मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
गडचिरोली जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्रितपणे विविध भागांत जाण्यासाठी वाहनाची अडचण जाणवत होती. अनेकदा संघटनात्मक कार्यक्रम व जनसंपर्क मोहिमांमध्ये गैरसोय निर्माण होत होती. ही गरज ओळखून संघटनेच्या कार्यासाठी कायमस्वरूपी वाहन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
संस्थापक अध्यक्ष अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सांगितले की, हे वाहन केवळ संघटनेच्या कामापुरते मर्यादित नसून, आवश्यकतेनुसार जनसेवेसाठीही वापरण्यात येईल. ग्रामीण भागात संघटनशक्ती अधिक मजबूत करण्यास आणि जनसंपर्क वाढविण्यास या वाहनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहील.
यावेळी यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, विनोद चापले, यादव चौधरी, प्रशांत ठाकूर, अमित चौधरी, स्वप्नील जुमनाके, सुरेश कोलते, दिलीप वलादे, सारंग सेलोटे, गणेश ठाकरे, कैलास लाडे, अंबादास लाजूरकर, विकास ठाकरे, विजय मठ्ठे, नामदेव भुसारी, कुणाल दुर्वे, दीपक कोहपरे, प्रकाश भजभुजे, राजेंद्र मेश्राम, हरबा दजगाये यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
