ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; व्येंकटरावपेठ येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात
प्रतिनिधी : राकेश तेलकुंटलवार, एटापल्ली
नवीन शैक्षणिक वर्ष २०२६–२७ च्या प्रारंभी जि.प. प्राथमिक शाळा, व्येंकटरावपेठ येथे शाळापूर्व तयारी मेळावा क्र. २ तसेच शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या ढोल-ताशांच्या गजरातील भव्य रॅलीने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर पंचायत अहेरीच्या नगराध्यक्षा मा. सौ. रोजाताई करपेत मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. कोंडागुर्ला सर, तर विशेष अतिथी म्हणून अहेरी केंद्राचे माजी केंद्रप्रमुख मा. श्री. विनोद पुसलवार उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. बाबुराव सडमेक, मुख्याध्यापक श्री. सुनिल मामीडवार, गावातील मान्यवर नागरिक, पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फुलांनी व रंगीबेरंगी फुग्यांनी आकर्षक सजविलेल्या ट्रॅक्टरमधून फॉरेस्ट चेकपोस्टपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. शाळेत आगमनानंतर विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षाव, टिळा, फुगे व टाळ्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व मोफत शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन केले. तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, शासनाच्या विद्यार्थीहिताच्या योजना तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती पालकांना देण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रम उत्साह, आनंद व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. सुनिल मामीडवार यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
