एटापल्ली:तालुक्यातील विविध गावांच्या मूलभूत सुविधांसाठी शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; धान्य गोदामे व रस्ते विकासाबाबत सकारात्मक आश्वासन
राकेश तेलकुंटलवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड, पुरसलगोंदी, गट्टा, वाघेझरी, कोईदूळ, चोखेवाडा, रेकणार, गुमळी, कन्नाळगाव, मेंढरी, कारका, आसावंडी आदी गावांतील नागरिकांनी तालुक्यातील प्रलंबित मूलभूत प्रश्नांबाबत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे धाव घेतली. शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्यांमध्ये धान्य साठवणुकीसाठी आवश्यक गोदामांच्या उभारणीचा मुद्दा अग्रक्रमाने मांडण्यात आला. मौजा गेदा येथे शासकीय धान्य गोदाम उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच मौजा उडेरा, कांदोळी, घोटसुर, पुरसलगोंदी, गट्टा, वांगेतुरी आणि गर्देवाडा येथे सोसायटी धान्य गोदामांची उभारणी करण्यात यावी, अशी ठोस मागणी करण्यात आली. सध्या शेतकऱ्यांना पिकवलेले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात धान्याची नासाडी होण्याची शक्यता वाढते, तसेच वाहतूक खर्चात वाढ होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर सुसज्ज गोदामांची उभारणी करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
याशिवाय तालुक्यातील अनेक ग्रामीण मार्गांची दुरवस्था हा गंभीर प्रश्न असल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. चोखेवाडा, कोईदूळ, गडदापल्ली, रेकणार, गुमळी, वेडमपायली, कान्हळगाव, मेंढरी या मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले असून माती-मुरूम टाकणे, खडीकरण व डांबरीकरण तातडीने करणे गरजेचे आहे. विशेषतः चोखेवाडा ते कोईदूळ दरम्यान मोठ्या पुलाच्या बांधकामाची मागणी जोरदारपणे करण्यात आली. पावसाळ्यात या मार्गांवरून वाहतूक ठप्प होते, ज्याचा परिणाम शिक्षण, आरोग्य व दैनंदिन व्यवहारांवर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
तसेच सुरजागड, हेड्री गट्टा व कोठी या मार्गांचे नूतनीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य, नाशिक येथील संचालक सैनुजी गोटा तसेच तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये रमेशजी वैरागडे, सुधाकर गोटा, लालसु नरोटे, रामा नैताम, हरिदास मठामी, सोमजी गावडे, कपिल मटामी, संदीप वैरागडे, सत्यवान रापांजी, राकेश मठ्ठामी, नानिश पोई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांकडून तांत्रिक अहवाल मागवून प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, लवकरात लवकर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
