सुधागुडम दौऱ्यात माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतल्या गावकऱ्यांच्या समस्या
पाणी, रस्ते व नाली बांधकामाच्या प्रश्नांवर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन
अहेरी (प्रतिनिधी) : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधागुडम गावाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जि.प. अध्यक्ष आणि अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देत गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
दौऱ्यादरम्यान गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, मुख्य पक्क्या रस्त्यांची गरज, नाली बांधकाम तसेच इतर मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत आपल्या समस्या मांडल्या. यामुळे गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गावात नागरिकांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांनी मांडलेल्या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा करून आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी दिले.
या दौऱ्यावेळी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
