भरधाव टिप्परची C-60 च्या बुलेटप्रूफ वाहनाला धडक; थरारक अपघातात जवान थोडक्यात बचावले
वेगमर्यादेचे उल्लंघन आणि अवजड वाहनांची वाढती वर्दळ; गडचिरोलीतील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
गडचिरोली :
गडचिरोली–धानोरा मार्गावर आरमोरीच्या दिशेने जात असलेल्या भरधाव अवजड टिप्पर ट्रकने C-60 पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने वाहनातील जवानांचा जीव थोडक्यात बचावला असून मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली ते धानोरा मार्गावरील सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या ठिकाणी गिट्टी खाली करून संबंधित टिप्पर वाहन पाचगाव (नागपूर)कडे परत जात होते. दरम्यान अचानक समोर आलेल्या दुचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने टिप्पर उजव्या बाजूला वळवला. त्याच वेळी समोरून येत असलेल्या C-60 पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला त्याची जोरदार धडक बसली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टिप्परचा वेग अत्यंत जास्त होता. धडक इतकी भीषण होती की बुलेटप्रूफ वाहनाच्या चालकाच्या बाजूच्या मागील चाकाला जोरदार धक्का बसून टायर पूर्णपणे फुटला व लोखंडी डिस्कही वाकून गेली. तसेच टिप्पर वाहनाच्या समोरील टायरचे दोन नट-बोल्टही जागेवरून निघून गेल्याचे दिसून आले.
धडकेनंतर C-60 वाहनाचा मागील टायर फुटल्याने वाहन काही क्षण अनियंत्रित झाले आणि पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या खालच्या भागात उतरले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे आणि वाहन बुलेटप्रूफ असल्यामुळे सर्व जवान सुरक्षित बचावले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी C-60 पथकातील जवान दिवस-रात्र जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. मात्र जिल्ह्यातील रस्त्यांवर अवजड वाहनांची वाढलेली वर्दळ, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि वाहतूक व्यवस्थेतील अनियमितता यामुळे जवानांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात खनिज, लोखंड, लाकूड तसेच इतर मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर टिप्पर आणि ट्रकची वाहतूक सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असून वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. परिणामी नागरिकांसह पोलीस आणि सुरक्षा दलांनाही प्रवास करताना जीव धोक्यात घालावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणावे, वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे तसेच संवेदनशील मार्गांवर विशेष वाहतूक नियम लागू करावेत, अशी मागणी गडचिरोलीकरांकडून केली जात आहे.
